Description
‘लौकिक दंतकथा’ ह्या विषयावर मराठी भाषेंत आजपर्यंत एकही ग्रंथ प्रसिद्ध झालेला प्रस्तुत लेखकाच्या अवलोकनांत आलेला नाही. साधारण जनसमूहाचे पूर्वकालीन अचारविचार, चालीरीती, कल्पना, समजूती, दंतकथा, अंधश्रध्दा आणि विपरीत ग्रह, ह्यांचा ज्यात समावेश होतो, अशा प्राचीन विद्या आणि प्राची वस्तुसंशोधन शास्त्र, ह्यांच्या शाखेस ‘लौकिक दंतकथा’ म्हणावे. अशी ह्या विषयाची व्याख्या एका इंग्रजी ग्रंथकर्त्याने केली असून, ती बहुमान्य झालेली आहे. आणि प्रस्तुत पुस्तकांत ह्याच व्याख्येत अंतर्भूत होणाऱ्या विषयाचा समावेश केलेला आहे.
प्रस्तुत पुस्तकांत जी माहिती दिली आहे तिचें परीक्षण केले असतां यात दर्शित केलेल्या समजुती पूर्वकाळी आपल्या समाजांत रूढ असून, त्यांचा पगडा अजूनही बहुजनसमाजावर आहे, ही गोष्ट लक्ष्यात येईल. आपल्या बहुतेक धर्मविधींतही ह्या समजुतींचे अवशेष सापडतात.
प्रस्तुत पुस्तकांत दिलेली माहिती जरी अत्यंत परिश्रमानें व काळजीपूर्वक गोळा करण्यात आलेली आहे, तरी ती सर्वस्वी खरीच असेल असे निश्चयाने सांगता येत नाही. तसेच ती पुष्कळ बाबतींत अपूर्णही असण्याचा संभव आहे.