Description
रा. रा. दत्ता पाटील यांचे नाट्यलेखन एक रसिक म्हणून मला महत्त्वाचे वाटते. ते हवेतून उतरत नाही. ते पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश अशा पंचमहाभूतांतून येते. किंवा इतके कशाला ? ते भूमीशी घट्ट बांधलेले असते म्हणून ते महत्त्वाचे. त्यासाठी लेखकाच्या हृदयात भूमी हवी. दत्ता पाटील यांच्या जवळ ती आहे. या नाटकाच्या केंद्रस्थानी शेतकरी कुटुंबातला एक तरुण आहे. तो उच्चशिक्षित आहे, मुख्य म्हणजे कवी आहे. पण शेतकरी असल्याने लग्नाचे वय उलटून गेलेय तरी तो एकटा आहे. आजच्या महाराष्ट्रातल्या खेड्यातील उच्चशिक्षित अविवाहित तरुणांचा तो प्रतिनिधी आहे. पण त्या पल्याड तो कवीही आहे. म्हणूनच त्याचे आंतरिक जग, त्याची घुसमट आपल्याला अस्वस्थ करते. दत्ता पाटील यांच्या लेखणीतून ती अत्यंत तीव्रतेने आपल्यापर्यंत पोहोचते. आजच्या खेड्यातील तरुण शेतकरी मुलांच्या जगण्यातील उदासी आणि एकाकीपणाने सुरू होत हे नाटक एका कवीच्या घनघोर आंतरिक संग्रामाचा जो प्रत्यय देते, तो केवळ असाधारण असा आहे.
1
- रंगनाथ पठारे