Description

ग्यानबा-तुकारामांची कविता समजावून घेतली की मराठे लोकांच्या मनाचा तळ सापडतो असे अॅक्वर्थ नावाच्या इंग्रज अभ्यासकाने म्हटल्याचे राजारामशास्त्री भागवतांनी त्यांच्या एका निबंधात उद्धृत केले आहे. या कवींनी आजही एक बृहद् भाषिक समूह म्हणून आपल्याला बांधून ठेवलेले आहे. ज्ञानेश्वर ते तुकाराम या परंपरेतला एखादा तरी अभंग माहीत नाही असा मराठी माणूस सापडणार नाही. भले तो सुशिक्षित असो वा अशिक्षित. अभंग माहीत असणं हीच त्याच्या मराठीपणाची अस्सल खूण. श्रवण भक्तीच्या जुन्या जमान्यात किर्तनांच्या द्वारा ऐसपैस पध्दतीने अभंगाचे निरूपण होई. आता किर्तनकार सेलिब्रिटी झाले आहेत. कारण आपण सुध्दा कृतक उत्सवांचे शौकीन झालो आहोत.
या अशा जमान्यात डॉ. दिलीप धोंडगे यांनी तुकोबांच्या अभंगाचे निरूपण सुमारे १००० पृष्ठांत केले आहे. ते अभ्यासपूर्ण तर आहेच खेरीज शब्दांचा नेटका आणि किमान वापर करीत वाचकाला सारे काही देणारे आहे. निरूपणात अर्थ-निर्णयन असतेच. ते या निरूपणात फार कसोशीने आणि जिव्हाळ्याने उतरले आहेत. संत साहित्य हे परमेश्वराची उत्कट भक्ती आणि आर्त जनांचा कळवळा यांतून स्फुरण पावलेले आहे असे सांगणाऱ्या दिलीप धोंडगे यांनी आधुनिक काळात असाधारण ठरेल असे हे काम करून आपल्यावर फार मोठे उपकार करून ठेवले आहेत. हे निरूपण वाचून, वाचलेल्याचे आंतरिकीकरण करूनच आपण त्यांचे थोडेफार उतराई होऊ शकतो.