Description
काव्य हा कवीचा सर्जनशील आविष्कार असतो. काव्यात कवीने नवी, अपूर्व अशी सृष्टी निर्माण केलेली असते. तिथे कवीने नित्याच्या परिचित वस्तूंकडे नव्या पद्धतीने पाहिलेले असते. काव्यातील वर्ण्यविषय भावानुभवयुक्त व सौंदर्यलक्ष्यी असल्यामुळे तो भावप्रतीती, अनुभवप्रतीती व सौंदर्यप्रतीती देतो. काव्य वाचकागणिक नवे अर्थ देत भावात्मक, सौंदर्यात्मक, बोधात्मक, रंजनात्मक, क्रीडात्मक अशा स्वरूपाची अनेकविध कार्ये करू शकते. भावानुभवाची उत्कटता हा काव्याचा महत्त्वाचा गुण असतो. ही उत्कटता दुहेरी असते. कवी स्वतःचे उत्कट अनुभव काव्यातून व्यक्त करतो आणि वाचक काव्यवाचनातून उत्कट अनुभव घेतो. उत्कटता, भावनाशीलता, चिंतनशीलता यांमुळे काव्यातील स्थल-काल- व्यक्तिविशिष्टता गळून पडते. उत्कट भावानुभवाबरोबरच जीवनाशय व्यक्त करण्याची काव्याची क्षमता मोठी असते. काव्यात कोणताही विषय वर्ज्य नसतो. काव्य आत्मपर, अनात्मपर किंवा या दोहोंचे मिश्रण असू शकते. तसेच ते वर्णनात्मक, कथनात्मक, नाट्यात्मक, भाष्यात्मक, चिंतनात्मक, कार्यात्मक, समूहनिष्ठ व वस्तुनिष्ठ अशा विविध स्वरूपाचेही असू शकते.
आधुनिक मराठीत ‘काव्य’ हा महत्त्वाचा साहित्यप्रकार आहे. विविध वृत्ति-प्रवृत्ती, आशयाभिव्यक्ती व क्षमता असलेल्या कवी-कवयित्रींनी हा साहित्यप्रकार घडवला आहे. मराठी काव्यात प्रभाव, उद्देश, आशयाभिव्यक्ती व जीवनदृष्टी इत्यादी पातळ्यांवर पुष्कळ वैविध्य आहे. या वैविध्यामधून बारा कवी-कवयित्री व त्यांच्या काव्याची प्रस्तुत संपादित काव्यसंग्रहासाठी निवड केलेली आहे. सदर कवी-कवयित्रींचे मराठी काव्यपरंपरेतील विविध वृत्ति-प्रवृतींशी नाते आहे. त्याचबरोबर त्यांची कवी-कवयित्री म्हणून ओळख आहे.