Description
संवेदनशील माणसाने व्यवस्थेत असावे की नसावे ? या व्यवस्थेत राहून जगण्याचा पसारा सावरण्यासाठी संवेदनशीलता किती बोथट किती टोकदार करावी ? कलावंताचे मन असणाऱ्या माणसाने शासकीय यंत्रणेत काम करताना स्वतःला कसं विभागावं ? वर्षानुवर्ष व्यवस्थेचा भाग असल्यामुळे सारी यंत्रणा कुठे, किती, कशी आहे ही जाणीव ठेवून एखाद्या जिगसॉ पझल सारखं स्वतःला तिच्यात कसं अड्जस्ट करावं ? संपूर्ण भवतालाचा अर्थ नव्याने समजून घेण्यासाठी कादंबरी लिहावी, कथा लिहावी की कविता लिहावी ?
“उध्वस्त वर्तमानाच्या दाही दिशा” हा कवितासंग्रह वाचताना असे अनेक अनेक प्रश्न संजय कृष्णाजी पाटील या माझ्या मित्राला पडले असावेत असं सतत वाटत राहतं. हतबल वाटण्याच्या या काळात स्वतःचं बोट स्वतःच धरून उभं करायला आणि त्याच वेळी ते बोट स्वतःकडेही दाखवत स्वतःलाच विचारात पाडायला हा कवितासंग्रह भाग पाडतो. इतकी वर्षे शासकीय यंत्रणेत काम करणाऱ्या, सतत एका कलावंताचे मन घेऊन भवतालात वावरणाऱ्या.. संवेदनशील असूनही कधी भावविवश न वाटता कर्तव्यकठोर वाटणाऱ्या.. कादंबरी, कविता, कथा, नाटक या सगळ्यात स्वतःला शोधत वणवण भटकणाऱ्या.. सदा सर्वदा अस्वस्थतेची कळ छातीत घेऊन फिरणाऱ्या या माझ्या मित्राचा हा तिसरा कवितासंग्रह. शासकीय भाषेत “स्वतःची” कवितिक भाषा शाबूत ठेवणाऱ्या माझ्या मित्राच्या या संग्रहाला भरभरून शुभेच्छा.
हा कवितासंग्रह मराठी काव्यदिंडीचा एक वेगळा अर्थ होईल असा विश्वास वाटतो.
सौमित्र