Description
जगातील भूतकालीन, वर्तमानकालीन भाषांचा अभ्यास हे भाषेच्या शास्त्रीय अभ्यासाचे क्षेत्र आहे. या अभ्यासातून मिळालेली विशिष्ट भाषानिरपेक्ष तत्त्वे आणि नियम कोणत्याही भाषेच्या प्रगत व व्यापक अभ्यासाला उपकारक ठरतात. यातून त्या भाषेचे स्वरूप अधिक स्पष्ट होत जाते. या शास्त्राच्या दोन प्रमुख अभ्यासशाखा-ऐतिहासिक आणि वर्णनात्मक, अशा आहेत. त्यांच्या दरम्यान भाषिक भूगोल हे शास्त्र आहे. एकाच भाषेच्या विविध रूपांची भौगोलिक वाटणी, स्थानिक वैशिष्ट्ये, पोटभाषांचे परस्परसंबंध इत्यादी स्पष्ट करायला ही शाखा मदत करते. प्रस्तुत पुस्तक मराठीच्या पदवी व पदव्युत्तर, नियमित व दूरस्थ विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षकांसाठी खास अध्ययन व अध्यापनास उपयुक्त असा दृष्टिकोण ठेवून लिहिलेले आहे. विशेषत: विविध विद्यापीठातील बी. ए. आणि एम्. ए. च्या विद्यार्थ्यांना, तसेच प्राथमिक व माध्यमिक स्तरांवर भाषाविज्ञानाचे अध्यापन करणाऱ्या शिक्षकांनाही या पुस्तकाचा उपयोग होऊ शकेल. ऐतिहासिक भाषाविज्ञान, स्वनविज्ञान, अर्थविचार, भाषिक आदानाचे स्वरूप, मराठीचा उत्पत्तिकाल, मराठीचे कालिक भेद, वर्णनात्मक भाषाविज्ञान, ध्वनिविचार, पदविचार, वाक्यविचार, प्रमाणभाषा व बोली, वऱ्हाडी, अहिराणी, कोकणी यांसारखे मराठीचे प्रादेशिक भेद या विषयांची अध्ययन व अध्यापनसुलभ मांडणी हे या पुस्तकाचे ठळक वैशिष्ट्य आहे. शिवाय भरपूर संदर्भ ग्रंथ, सोदाहरण स्पष्टीकरण, विद्यार्थी आणि शिक्षक दोघांनाही उपयोगी पडेल अशी विस्तृत प्रश्न सूची यांमुळे हे पुस्तक विशेष उपयुक्त ठरणार आहे. – डॉ. अलका मटकर