Description
बापटांची कविता वाचताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे त्यांचे शब्दांवरील विलक्षण प्रभुत्व. त्यांचे शब्दभांडार संपन्न असल्याने ते शब्दांची अक्षरश: उधळण करतात. त्यांच्या कवितेला नाना नखऱ्यांनी नटणे-मुरडणे मनापासून आवडते. त्यांच्या शैलीचा चमकदार नखरा रसिकांना मोहवितो. त्यांच्या काव्यातील संस्कृत शब्दकळा, लावणीची शब्दकळा आणि शाहिरी काव्यातील सुंदर शब्दकळा चटकन लक्ष वेधून घेते. त्यांच्या भाषेला नादानुकारी शब्दांचे वेड आहे. त्यामुळे काव्याला सहजसुलभ गेयता व लयबद्धता लाभली आहे. आंतरिक लय आणि नादमयता त्यांच्या काव्यात विपुल आहे. त्यांच्या भाषेला कल्पकतेची जोड मिळाल्याने ती अधिक सौंदर्यवती झाली आहे.. त्यांची कविता पायात चाळ बांधून भान हरपून नाचत असते. उपहास-उपरोधगर्भ शैली हा त्यांच्या काव्यशैलीचा एक महत्त्वाचा विशेष आहे.