Description
बिस्मिल्ला खाँ ह्यांची शहनाई, झाकीर हुसैनचा तबला आणि मोहम्मद रफीची भजने… सगळे काही ऐकत राहावेसे वाटते. अरे हे तर मुसलमान ! असा खत्रूड विचार आपल्या मनाला कधी शिवला नाही. अलीकडे मात्र असा शोध आणि तपशील खोलात घेतला जातो. द्वेष आणि तेढ वाढता वाढता वाढे… अशी आजची परिस्थिती आहे. कुठलेही क्षेत्र घ्या, निदान भारतात तरी खान, हुसैन, रफी तिथे दिसतातच. क्रिकेटसुद्धा ह्याला अपवाद नाही. इथेही कितीतरी मुसलमान क्रिकेटपटू देशासाठी सर्वस्व पणाला लावून खेळले होते असे दाखले आहेत. त्यांचे ‘दिल हिंदुस्थानी’च राहिले. ह्या देशात क्रिकेट अतिशय लोकप्रिय आहे. त्यासाठी ह्या खेळाडूंचे योगदान नगण्य नाही. हीच बाब ह्या पुस्तकाने अधोरेखित केली आहे. लेखक संजीव पाध्ये ह्यांनी अशा जांबाज क्रिकेटपटूंवर झोत टाकला आहे. केवळ त्यांची मैदानातील कामगिरी आणि आकडेवारी न देता ह्यातला प्रत्येक जण माणूस म्हणून कसा होता, आहे ह्याचे दर्शन सोप्या भाषेत लेखकाने घडवले आहे. उगीच कुणाचेही उदात्तीकरण केलेले नाही. ज्याच्याकडून चुका झाल्या त्याही नमूद केल्या आहेत. तर काही असे खेळाडू जे भारताकडून खेळू शकले नाहीत त्यांचीही नोंद घेतली आहे. अनेक किस्से, प्रसंग, माहिती ह्या पुस्तकात सहज आली आहे. त्याने हे पुस्तक वाचनीय झाले आहे. ह्यात आकडेवारीही आहे. त्यामुळे क्रिकेटपंडित आणि चाहते दोघांसाठी ते मोलाचे बनले आहे. गढूळ बनत चाललेले वातावरण
निवळण्यासाठी अशा प्रकारच्या पुस्तकांची गरज आहे.






Reviews
There are no reviews yet.