Description
साहित्यशास्त्रातील विविध संकल्पना, साहित्याची विविध अंगे, त्यांचे परस्पर संबंध, ऐतिहासिक क्रमातील त्यांचा उद्गम-विकास यांची चर्चा करताना आपण नाट्यशास्त्रातील रससिद्धांतांपासून प्रारंभ करतो. परंतु इ. स. २०० पासून इ. स. सहाव्या-सातव्या शतकापर्यंत ही नाट्यचर्चा काव्यचर्चेत रुपांतरीत होताना तिच्या अनेक घटकांची पुनर्व्यवस्था झाली, तिच्यात अनेक अवस्थांतरे झाली. नाटकातील अभिनय आणि संवाद यांची जागा शब्दार्थ प्रधान साहित्यात अलंकार, वक्रोक्ति आदी तत्वांनी घेतली. नवव्या-दहाव्या शतकात ध्वनिसिद्धांताची प्रस्थापना होऊन रससिद्धांताचे शब्दार्थ प्रधान साहित्यामध्ये उपयोजन करण्यात आले. त्यातून साहित्यसंबंधीच्या प्रश्नांची तात्विक अधिष्ठानावर आधारित शास्त्रीय स्वरुपाची मांडणी होऊन समग्र बैठक असलेले साहित्यशास्त्र उभे राहिले. साहित्यशास्त्र म्हणजे नेमके काय, साहित्याचे स्वरूप, त्याचे आत्मतत्व, साहित्याचे प्रयोजन, त्याची निर्मिती प्रक्रिया, आस्वाद प्रक्रिया या सर्व अंगांनी ही चर्चा झालेली आढळते.