Description
जागतिक राजकारण, अर्थकारण आणि व्यापार यातून पोसली गेलेली अन्यायकारक विषमता, भारतासारखे अर्धविकसित किंवा अविकसित देश यांच्यावर लादलेले अन्याय- अत्याचार, जागतिक बाजारपेठेचे उग्र अत्याचारी स्वरूप, वैज्ञानिक-तांत्रिक विकास, प्रतिजैविके इत्यादिंनी जगात उडवून दिलेला हाहा:कार याबद्दल श्री. करंजीकर यांनी आकडेवारी देत मार्मिकतेने लिहिले आहे. आधुनिक बाजारपेठेच्या तत्त्वज्ञानाने आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाने तर मानजातीने विकसित केलेल्या नैतिक मूल्यांना पार उलटेपालटे करून टाकले आहे. ‘सावध ऐका पुढल्या हाका !’ या आणि त्यापुढच्या लेखात मनुष्यजातीच्या भवितव्याबद्दल ज्या गंभीर शंका व्यक्त केल्या त्या साधार व समर्थनीय आहेत. श्री. दीपक करंजीकर यांनी हाताळलेल्या जगड्व्याळ व गुंतागुंतीच्या विषयावर सुसंगतीने लिहिणे हे कठीण काम आहे; ते साध्य केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन.- अरुण साधू, ज्येष्ठ लेखक, माजी साहित्य संमेलनाध्यक्ष
अनेक महत्त्वाच्या विषयांवर इतकी मुद्देसूद मांडणी दुर्मीळ. प्रचंड अस्वस्थ करणारी जाणीव हे पुस्तक देते. आंतरराष्ट्रीय, आर्थिक, राजकीय धोरणांविषयी श्री. करंजीकर यांनी नुसती माहितीच नाही तर विचारही मांडला आहे; त्यामुळे व्यापार-उद्योग विषयक कायद्यांकडे पाहताना दृष्टिकोनाची नवी खिडकी उघडली. जागतिकीकरणाचा उदोउदो करताना आपले सत्त्व, संस्कृती आणि सुख कुठे हरवते आहे हे पाहायला हवे आणि ते जपायला हवे हे पुढच्या पिढीला सांगणारे, त्यांना जागे करणारे हे पुस्तक आहे.- मृदुला भाटकर, न्यायमूर्ती, मुंबई उच्च न्यायालय
हे पुस्तक आपल्याला सद्यपरिस्थितीची जाणीव करून देणारे आहे. जगामधे किती विषमता आहे, आपल्या चुकीच्या विकासनीतीमुळे पर्यावरणाचा किती हास प्रगत पाश्चात्त्य राष्ट्रे करत आहेत; विशेषत: अमेरिका ही सर्व जगभर युद्ध पसरवत सगळ्या जगाला विनाशाकडे कसे नेत आहे या सगळ्याविषयी सहजपणे उपलब्ध नसलेली, आकडेवारीसकट सखोल माहिती दीपकने या पुस्तकात मांडली आहे. प्रत्येकाने वाचावेच असे पुस्तक.- अच्युत गोडबोले, संगणकतज्ञ, व्यवस्थापनतज्ञ, ज्येष्ठ लेखक
‘आजच्या विश्वाचे आर्त’ हा दीपक करंजीकर या माझ्या मित्राच्या उद्वेगाचा अग्निप्रपात आहे. त्याचा हा उद्गार वाचताना मनाला केवळ चटकेच बसत नाहीत, तर आपल्या आत्म्याची आहुती त्यात पडून आत्माच खाक व्हावा असे क्षणोक्षणी वाटते. – कवी नलेश पाटील