Description
कविता लिहिणं कुठल्याच अर्थानं लाभदायक नसताना समुहाच्या उरल्यासुरल्या स्वप्नांना फुलवण्याचा घेतलेला वसा पूर्ण करण्यासाठी लिहिली गेलेली ही कविता आहे. नागफण्यातून विष धावून यावं तसं धावून येणारं वर्तमान झेलताना होणारी कासाविशी कमी करण्यासाठी लिहिली गेलेली ही कविता आहे. अंगण परिसरात कोणती झाडं-वेली जगवावीत याची जागती जाणीव सातबाराच्या मालकांना देण्यासाठी लिहिली गेलेली ही कविता आहे. नात्यागोत्यांना कुरतडणाऱ्या संगणकाच्या माऊसवर जंतुनाशकाचा आग्रही फवारा मारण्यासाठी लिहिली गेलेली ही कविता आहे.उगवूच देणार नाही अशा धाकात कोंभांना ठेवणाऱ्या संकरीत वर्तमानापासून संरक्षण देत कोंभांना उगवण्याची जिद्द देण्यासाठी लिहिली गेलेली ही कविता आहे.





