Description
पाण्यातील पावले’ या लेखसंग्रहात प्रोफेसर तडकोडकरांनी लिहिलेले वट्ट बारा संशोधनपर लेख संकलित झाले आहेत. या संग्रहात साहित्य व साहित्यिक अशा दोन सूत्रांस धरून सादर केलेले लेख आढळतात. नामूलं लिख्यते किंचित् या प्रतिज्ञेशी सांधिलकी साधणारे हे लेखन आहे. या लेखांत संशोधनपरतेच्या सोबतीने, साहित्यनिर्मितीविषयक सैध्दान्तिक दृष्टिकोनही आढळतो. या संग्रहात कविवर्य पुरुषोत्तम शिवराम रेगे, बाकीबाब बोरकर, प्रभाकर पाध्ये या सुपरिचित साहित्यिकांवरील लेख आहेत. मध्यवर्ती मराठी वर्तुळात ज्यांच्या लेखनकर्तृत्वाने मराठीशारदेच्या अंगावरले अलंकार सुशोभित झाले, त्या साहित्यिकांचा, परिचय मात्र यथातथाच राहिला आहे, त्यांपैकी प्रोफेसर प्रल्हाद वडेर, कविवर्य दामोदर अच्युत कारे, गं. ब. ग्रामोपाध्ये यांच्यावर या संग्रहात समीक्षात्मक स्वरूपाचे लेख आढळतात. हे लेख म्हणजे विस्मृतीत जाऊ पाहणाऱ्या व विस्मृतीत गेलेल्या प्रतिभावंतांच्या व प्रज्ञावंतांच्या लेखनाचे एक प्रकारे आलोडनच होय, असे म्हणता येते. या संग्रहात पीएच. डी. सदृश संशोधन करू पाहणाऱ्यांना बरेचसे मूलद्रव्य व पाथेय देखील उपलब्ध होऊ शकेल.