Description
आदिवासी साहित्याच्या क्षेत्रातील आघाडीचे कवी व समीक्षक डॉ. विनोद कुमरे हे ‘कोयतर’ या कादंबरीलेखनाच्या निमित्ताने मराठी कादंबरीच्या क्षेत्रात प्रवेश करीत आहेत. त्यांची ‘कोयतूर’ ही कादंबरी आदिवासी जीवनरूपाला, त्यांच्या समस्याग्रस्ततेला, प्रश्नोपप्रश्नांना व अभ्युदयमार्गांना सुस्पष्ट करणारी अशी महत्त्वपूर्ण कादंबरी आहे. विदर्भाच्या भौगोलिक परिसरातील गोंड आदिवासी जमातीवर केंद्रिभूत असलेली ही कादंबरी समस्त आदिवासी समाजाच्या जीवनसंघर्षाला व त्यांच्या शोषित- वंचिततेला अधोरेखित करते तसेच त्यांच्या अस्मिता व अस्तित्व शोधाची खडतर वाटचालही प्रातिनिधिकपणे अभिव्यक्त करीत जाते. स्थानिक, प्रादेशिक, राज्यस्तरीय, देशस्तरीय आणि एकूण वैश्विक संदर्भांची संपृक्तीदेखील या कादंबरीमधून ठळकपणे पाहावयास मिळते. अनेक शतकांपासून उपेक्षित व वंचित गोंड आदिवासींच्या जीवनरूपांना, जीवनसमस्यांना ही कादंबरी कधी चर्चात्मक, तर कधी चिंतनात्मक पद्धतीने हात घालते आणि त्या समस्यांच्या निराकरणाचे मार्गदेखील अधिक सुस्पष्ट करू पाहते. भारतीय समाजसंरचनेमध्ये सर्वार्थाने उपेक्षित असलेल्या गोंड या आदिवासी जीवनाचा असा प्रदीर्घ पट डॉ. विनोद कुमरे यांच्या ‘कोयतूर’ या कादंबरीच्या रूपातून मराठी कादंबरीमध्ये पहिल्यांदाच इतक्या कलात्मक, प्रत्ययकारी व प्रभावी पद्धतीने प्रगट झालेला आहे.