भालचंद्र वनाजी नेमाडे (Bhalchandra Nemade) यांचा जन्म जळगाव जिल्ह्यातील सांगवी या गावी झाला. नेमाडेंनी सन १९५५ मध्ये भालोदच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये एस.एस.सी. केले. पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयाततून १९५९ मध्ये बी.ए. केले. पुण्याच्या डेक्कन महाविद्यालयातून भाषाविज्ञान या विषयात सन १९६१ मध्ये एम.ए. केले. सन १९६४ मध्ये मुंबई विद्यापीठातून एम.ए. (इंग्रजी) केले. सन १९८१मध्ये औरंगाबादच्या मराठवाडा विद्यापीठातून पीएच.डी केली. सन १९९३ मध्ये जळगावच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने त्यांना मानद डी.लिट प्रदान करून सन्मान केला. सन १९६४ पासून १९९८ पर्यंत अहमदनगर-धुळे-औरंगाबाद-लंडन-गोवा-मुंबई असा त्यांच्या अध्यापकीय पेशाचा प्रवास आहे. इंग्रजी भाषा आणि साहित्य, वाङ्मय प्रकार, भाषाविज्ञान, शैलीविज्ञान, भाषांतर, तौलनिक साहित्य, भारतीय साहित्य, मराठी भाषा आणि साहित्य हे त्यांच्या अध्यापनाचे आणि संशोधनाचे विषय.
नेमाडे हे मातृभाषा मराठीचा देशीयवादी पुरस्कार करणारे लेखक असल्यामुळे त्यांची बहुतांश ग्रंथरचना मराठी भाषेतच झालेली आहे. ‘मेलडी’ (१९७०) हा त्यांचा पहिला कवितासंग्रह, ‘देखणी’ (१९९१) हा दुसरा कवितासंग्रह, ‘कोसला’ (१९६३), ‘बिढार’ (१९७५), ‘हूल’ (बिढारचा दुसरा भाग २०००), ‘जरीला’ (१९७७), ‘झूल’ (१९७९) ह्या कादंबर्या. ‘साहित्याची भाषा’ (१९८७), ‘टीकास्वयंवर’ (१९९०), ‘तुकाराम’ (इंग्रजी १९८०), ‘दी इंफ्ल्यूअन्स ऑफ इंग्लिश ऑन मराठी:अ सोशिओलिंग्विस्टिक अँड स्टाइलिस्टिक स्टडी’ (इंग्रजी १९९०) हे समीक्षाग्रंथ.