या पुस्तकाविषयी
प्रत्येक ऋतूमध्ये आलापल्लीचं वेगळंच रूप दिसायचं. उन्हाळ्यात कोरडंठाक पडलेलं गाव, ओढ्यापलीकडचं जंगल, एका पावसातच, जादूची कांडी फिरल्यासारखे, हिरवंगार दिसू लागायचं. आठ-आठ दिवस पावसाची झड लागायची. जंगलातलाच पाऊस तो. त्याचं कोसळणं पण जंगलीच असायचं. पाणी पिऊन पिऊन, जमीन-झाडे तृप्त होऊन जात. मृद्गंध पसरवीत हिरवा रंग, कानाकोपऱ्यात जाऊन पोहचायचा. आणि मग निसर्गाची जादू, नजरेला भुरळ टाकू लागायची. पायवाटा आणि सडक सोडली तर हिरव्या रंगाचे विभम्र डोळ्यांचे पारणे फेडत. पोपटी, लिंबोणी, शेवाळी, हिरवा, पारवा अशा सर्व छटांचे मिश्रण असलेला, रानफुलांचे नाजूक बुट्टे असलेला, सुंदर शालू नेसलेली आलापल्ली, एकदम श्रीमंत झाल्यासारखी वाटायची. रस्त्यांच्या बाजूला ज्या उतरणी असत, तिथे पाणी साचून मोठमोठी तळी तयार होत. त्यामधून, दोन्ही हातात मावणार नाहीत असे मोठाले बेडूक, गळ्याखालच्या पिशव्या फुगवून, कर्कश्श आवाजात डराव डराव सुरू करीत. पावसाळी पाकोळ्यांच्या झुंडीच्या झुंडी जागोजागी फेर धरताना दिसायच्या. त्यांना फडक्याने पाडून गोळा करण्यासाठी आदिवासींची मुले गर्दी करायची, पंख झाडून त्यांची चटणी करण्यासाठी. श्रावणात जमिनीतल्या बिळांमधून लालचुटूक रंगाचे मखमली किडे निघायचे. काळ्याभोर जमिनीवर कुंकू सांडल्यासारखे ते दिसायचे.
पुस्तकाची छायाचित्रे
लेखकाविषयी
अभिप्राय आणि मानांकन
अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.
अभिप्राय लिहिण्यासाठी साइन इन कराइथे अजून काही लिहिलेले नाही.