या पुस्तकाविषयी
समकालीन राजकीय, सामाजिक परिस्थितीवरील तीव्र प्रतिक्रिया थेटपणे व्यक्त करणे हे नव्वदोत्तर कवितेचे वैशिष्ट्य असले तरी संजय पाटील या समकालीन वास्तवाचा फक्त उल्लेख करीत नाहीत, किंवा केवळ त्यावरच्या प्रतिक्रिया नोंदवत नाहीत, तर ते वास्तव किती विसंगत आहे, किती उफराट्या, परस्परविरोधी ताण्याबाण्यातून ते घडलेले आहे, मुळात ते किती भीषण आहे हे ते दाखवून देतात. ते दाखवीत असताना ते त्यावर सूक्ष्म, सूचक भाष्यही करीत असतात. या वास्तव चित्रणातून त्यांची स्वतःची भूमिकाही सूचित होत असते. हे सारे साधण्यासाठी ते उपरोध, उपहास आणि कारुण्याची छटा दडवणारा विनोद (ब्लॅक ह्युमर) ही भाषेतली शस्त्रे अतिशय परिणामकारकपणे वापरतात. संजय पाटील यांची भाषेवरील हुकमत आणि नेमक्या शब्दांचे अचूक ठिकाणी उपयोजन करण्याचे त्यांचे कसब विस्मय वाटायला लावणारे आहे. संजय पाटील यांची तल्लख, हजरजबाब देणारी बुद्धिमत्ता, बेगुमान आविर्भाव, सडेतोडपणा, नागवल्या जाणाऱ्यांबद्दलची कणव आणि लुबाडणाऱ्यांबद्दलचा संताप, शासकीय निगरगट्टपणाबद्दलची कडवट चीड अतिशय टोकदारपणे व्यक्त झालेली आहे. शब्दांचे तिरकस फटकारे मारत, उपरोधाचा सूक्ष्म वापर करीत ते समकालीन वास्तव उभे करतात. हळवेपणा, भावुकता आणि गद्यप्रायता टाळून त्यांनी कवितेची एक वेगळी भाषा घडवली आहे. वर्तमानाचे वास्तव पकडण्यासाठी त्यांनी भाषेला कवितेतील प्रचलित संकेतांमधून सोडवून नवे पोत, नवी त्वचा दिलेली आहे. या भाषेच्या त्वचेवर भवतालाच्या घडामोडीची अगदी सूक्ष्म थरथरही उमटून येते. बदलून गेलेले, अंतर्विरोधाने विस्कटून गेलेले, अस्वस्थ करणारे वास्तव ही पाटील यांच्या कवितेची विस्तीर्ण भूमी आहे. वर्तमान वास्तवाकडे पाहण्याची लोकविलक्षण नजर संजय पाटील यांना उपजतच लाभली आहे आणि त्या वास्तवाचा लक्ष्यभेद करणारे भाषेचे शस्त्र त्यांनी एकाग्रपणे वेगवेगळ्या कोनातून फिरवीत कवितेचे वेगळे सामर्थ्य वाचकाच्या प्रत्ययाला आणले आहे. या तलस्पर्शी भेदक नजरेने जग न्याहाळत त्यांचा काव्यप्रवास सुरू राहो ही शुभेच्छा. डॉ. प्रभा गणोरकर
पुस्तकाची छायाचित्रे
लेखकाविषयी
संजय कृष्णाजी पाटील यांची पुस्तके
अभिप्राय आणि मानांकन
अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.
अभिप्राय लिहिण्यासाठी साइन इन कराइथे अजून काही लिहिलेले नाही.