Description
अहिराणी भाषेतील म्हणींचा समावेश मराठीच्या खजिन्यात झाला तर मराठी भाषा अधिक संपन्न, वैभवशाली होईल असे मला वाटते. आधुनिक जीवनशैलीचा स्वीकार, पाश्चात्य संस्कृतीचे आक्रमण आणि जागतिकीकरणाच्या रेट्यात आपल्या संस्कृतीचा हा समृद्ध वारसा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. आपल्या समृद्ध परंपरा जाणून घेण्यासाठी अहिराणीतील हे मौलिक धन जपणे आवश्यक आहे. त्यासाठी अहिराणीच नव्हे तर सर्वच बोलीतील म्हणींचे संकलन व अभ्यास होण्याची नितांत आवश्यकता आहे.अहिराणी म्हणींतून खानदेशातील कृषिप्रधान समाजव्यवस्था, शेतीविषयक पारंपरिक शहाणपण, शेतीशी निगडित मानवी वृत्ती-प्रवृत्ती, ग्रामसंस्कृती, गावगाड्याची पद्धती, जीवनराहाटी, व्यवसायानुसार जातिव्यवस्था, बलुतेदारीची प्रथा, सण-समारंभ, देवदेवता आणि त्यांचे पूजाविधी, लग्नविधी व त्याच्याशी निगडित रूढी-परंपरा, स्त्री-पुरुष मनाचे रंगढंग, नीतिमूल्ये, ऐतिहासिक- पौराणिक – भौगोलिक संदर्भ, संदर्भ, लोकमानस आणि लोकसंस्कृतीचे विविधांगी दर्शन घडते.