Description
कवितेच्या ऐसपैस माळरानावर दूर देवगडच्या सड्यावर प्रमोद जोशी नावाचं टवटवीत फूल काव्य रसिकांना भरभरून सुगंध देत आहे. प्रमोद जोशींची कविता अस्सल असल्यामुळे ती रसिकांपर्यंत थेट पोहोचते. एक विशिष्ट अशी आंतरिक लय, नादमाधुर्य आणि आशयसंपन्न रचना हे त्यांच्या कवितेचे वैशिष्ट्य.
आसपासच्या सर्व हालचाली अचूक टिपण्याचे सामर्थ्य प्रमोद जोशींकडे आहे. त्यामुळे विविध विषयावर लिहिताना त्यांना अनेक उत्तमोत्तम प्रतिमा सापडत जातात. आणि त्यातून चमकदार ओळी तयार होतात. संपूर्ण कवितेत बहुधा एखादीच ओळ एक विलक्षण उंची गाठते आणि कविता तिथेच थांबते. प्रमोद जोशींची कविता मात्र प्रत्येक शब्दागणिक उत्तुंग होत जाते. ज्या उत्कट जागी कविता पूर्ण झाली असं वाटतं तिथूनच नेमकी त्यांची कविता आनंद डोहाचा शोध घेत पुढे पुढे झेपावते आणि रसिकांना एका वेगळ्याच विश्वात घेऊन जाते.
तुझ्या हातात फूल दिलं तर तुझ्या बोटांचीच पानं झाली
माझी कविता तुझ्या ओठात ओलंचिंब गाणं झाली
अशा हळुवार प्रेमभावना व्यक्त करणाऱ्या प्रमोद जोशी यांच्या प्रतिभाशक्तीला आध्यात्माचाही स्पर्श झालेला आहे.
कुणी नाही माझे मी ना कुणाचा, नाते न कोठे परकीय जत्रा.
मी शांत मी तृप्त मी मुक्त झालो मी चाललो हीच आनंद यात्रा
अशा ओळी लिहिणारा हा कवी सोनेरी पंख घेऊन काव्याच्या गगनात भरारी घेत आहे.प्रमोद जोशींच्या “अक्षरऋतू” या कविता संग्रहासाठी माझ्या अगणित शुभेच्छा !