Description
‘अकुतोभय’ म्हणजे ज्याला कुठूनही आणि कोणाकडूनही भय नाही असा. शीर्षकापासूनच वेगळेपण आणि नावीन्य जपणारा हा प्रा. नीलेश शेळके यांचा पहिलाच कवितासंग्रह आहे; तरीही संग्रहातील कवितां मध्ये नवखेपणा फारसा नाही. ही कविता बोलते कमी पण सांगते अधिक अनुभूतीची अस्सलता आणि रचनेतील सफाईदारपणा कवितांमध्ये दिसतो.
कवी दुष्काळी शेती कसणाऱ्या; पण माती आणि पाणी यावर जिवापाड प्रेम करणाऱ्या शेतकऱ्याचा मुलगा आहे. त्यामुळे कृषिसंस्कृतीशी आणि त्यातील जगण्याशी निगडित असणारे अनेक संदर्भ कवितेभर दिसतात. त्याचबरोबर आधुनिक जगण्यातील आणि तंत्रज्ञानातील अनेक प्रतिमा कवितेत अर्थवाही रूप घेऊन सगुण साकार होतात. अध्ययन अध्यापनाच्या क्षेत्रातील बेगडीपण कवीला अस्वस्थ करते आणि त्याच अस्वस्थतेतून कविता वाचकांशी संवाद साधते.
नीलेश शेळके यांची कविता वाचताना आपण अस्वस्थ होतो, ती तापदायक वाटू लागते, तो ताप आपल्या संवेदनशीलतेवर आडव्या उभ्या फुल्या मारू लागतो. मनाला अंतर्मुख करणारी, अस्वस्थ करणारी कविता चांगली असते असे जर आपण मानत असू तर नीलेश शेळके यांची कविता निश्चितच चांगली कविता ठरते. म्हणून कवितेवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकांनी ती वाचायला हवी असे मला वाटते.