Description
प्रगल्भ जाणिवेचा मुक्ताविष्कार म्हणजे ‘आंबेडकरी साहित्यातील जीवनमूल्ये’.
‘युध्दपक्षी’ या रसिकमान्य आणि बहुचर्चित कविता संग्रहानंतरचा प्रा. अशोक इंगळे यांचा हा प्रवास तेवढाच विलोभनीय निस्पृहणीय आहे. मानवी मूल्ये आणि मानवाची प्रतिष्ठा या युगप्रवर्तक आधारस्तंभांना शिरोधार्य मानून परिवर्तनवादी, बुध्दिवादी नि विज्ञानवादी दृष्टीने लेखन करणाऱ्या आंबेडकरवादी लेखकात त्यांचा समावेश होतो. जीवनमूल्ये आणि साहित्यमूल्ये यांचे सजग भान येथे उत्कटतेने प्रतीत होते.
प्रस्तुत ग्रंथातील समीक्षणात्मक/ वैचारिक लेख लेखकाच्या सर्जनशील चिंतनातून स्फुरलेली सघन संवेदनशील्पे आहेत. प्रखर बुध्दि- प्रामाण्यवाद नि ताटस्थ्याची भूमिका हे उत्तम लेखकाचे गुणविशेष ठरतात. त्याचा येथे प्रकर्षाने प्रत्यय येतो. समाज परिवर्तनाचा वसा चालविणाऱ्या चळवळीतील निष्ठावंत कार्यकर्त्यांना आणि नव्या सांस्कृतिक व वैचारिक प्रस्फुरणाने लेखन करणाऱ्या पुरोगामी वृत्तीच्या लेखकांना प्रस्तुत ग्रंथ उपयुक्त नि प्रेरणादायी ठरेल. मूल्ये ही मूल्ये असतात. त्यांची महत्ता नि उपयुक्तता स्थलकालातीत असते. त्याचा शोध बोध तेवढ्याच विजिगीषू वृत्तीने येथे शब्दांकित केलेला आहे.
– डॉ. रा. गो. चवरे