Description
नितळ पारदर्शी निवेदन हे देवकी वळवडे यांच्या कथनाचं प्रथमदर्शी वैशिष्ट्य. त्या अनुभवालाच थेट गोष्टीच्या पातळीवर नेतात. त्याची विरुपणं करणं दूरच, त्यात शक्यतोवर बदलसुध्दा त्या करीत नाहीत. किंवा त्याचा पोषाखही सहसा बदलत नाहीत. त्यांच्या या थेटपणाचा भाग म्हणून त्यांच्या कथेची निवेदक/गर्भित लेखक सहसा स्त्रीच असते. ही मध्यमवर्गीय नैतिकता व आदर्श मानणारी स्त्री आहे.माणूस म्हणून माणसांशी जोडले जाण्याची चाह व त्यातून मानवी नातेसंबंधाचा शोध हे त्यांच्या कथांचं आणखी एक वैशिष्ट्य. माणसामाणसातल्या नात्यात त्याच्या जल्लोषात, सुखदुःखात स्वत:ला सामील करून घेण्याची इच्छा त्यांच्या कथांमधली निवेदक अनेकदा प्रकट करते. लिहिणाऱ्याच्या ठिकाणी आवश्यक असा वात्सल्यभाव व करुणाभाव त्यांच्या ठायी आहे. त्यांच्या लेखनातील आत्मपरतेमुळं तो आणखी गडद होतो. माणसांच्या समस्यात गुंतणं, त्यांची तड लावणं त्यांना आवडतं. सरळ साध्या आस्थाशील निवेदनपद्धतीचं आपल्याला भान देणं, त्याकडं लक्ष वेधणं हे महत्त्वाचं काम या कथा करतात. – रंगनाथ पठारे