Description
स्त्री हे सृष्टीचे सृजनरूप आहे. नवनिर्मितीचा ध्यास हा तिचा स्थायीभाव आहे. म्हणूनच स्त्रीचे चारित्र्य हे संस्कृती, सभ्यता शुद्धीकरणाशी अनुबंध जोडते. परंतु जेव्हा खोट्या पुरुषी भोगवृत्तीची विकृत लालसा जातपंचायतच्या नावाखाली तिच्या कौमार्य चाचणीची पूर्वपरीक्षा घेते; तेव्हा स्त्रीत्वाच्या सत्त्वमूल्यांशी होणारी अशी प्रतारणा असते. खरेतर, उंडारलेल्या समाजाला स्त्रीची सात्त्विक व सांस्कृतिक रूपे मान्यच नसतात. अशा भेदरलेल्या स्त्रीचे भेदिक दुःख, शारीरिक विटंबना, विकल मानसिकता वैश्विक स्तरावर अधिष्ठित करण्यासाठी कथा, कवितांचा पट अपुरा ठरतो आणि संवादरूपी कादंबरीचा विस्तीर्ण रूपबंध आकारास येतो.याच आशयाची निमा बोडखे यांची ‘अनाहिता’ ही कादंबरी पानापानांतून व्यवस्थेसंबंधीची निरीक्षणे नोंदवत अवैधानिक ठरलेल्या व संवेदनशील असलेल्या कौमार्य चाचणीसंदर्भात स्त्रीत्वाचा काटेरी आलेख मांडून लोचट परंपरेला निगुतीनं लाथाडते. पहिल्याच साहित्यकृतीतील शब्दकळा स्त्रियांच्या जगण्यातल्या असहायतेला स्पर्श करीत सामाजिक जाणिवेचा हळवा परिवेषही जागवते. शतकानुशतकाच्या प्रस्थापित संकेतांना न जुमानणारी तत्त्वतः मानवतावादाचा पुरस्कार करणारी ही कादंबरी प्रत्ययकारी असून वाचकांना नक्कीच अंतर्मुख करेल; अशी शाश्वती वाटते.