Description
नेमाडे यांनी ‘देशीयता’, ‘नवनैतिकता’, ‘वास्तववाद’ आणि ‘भाषिक कृती’ या संकल्पनांची केलेली मांडणी अधिक मूलग्राही आणि मूल्यगर्भ ठरते. साहित्यकृती ही एक भाषिक कृती असते असे म्हणून कृती या शब्दांवरील श्लेष नेमाडे सखोल वैचारिकतेने बोलका करतात. एकाच वेळी कृती या शब्दातून सूचित होणारे सामग्री संघटन आणि क्रिया करणे यातला सामाजिकतेचा अक्ष यांचा तोल नेमाडे साधतात. वसाहतवादाने झालेली वाताहत, पराभूत मनोवृत्ती, मराठी परंपरेतल्या महानुभाव आणि वारकरी संप्रदायातील रचनांचा रास्त अभिमान, आपल्या देशातील संस्कृती- पोटसंस्कृती, भाषाभिन्नत्व यांचा विस्तृत पट, आधुनिक भाषाविज्ञान, मानववंशशास्त्र आणि समाजशास्त्र यांचे समावेशक भान ठेवून त्यांनी आजच्या साहित्यव्यवहाराचे सर्व प्रश्न इतिहाससन्मुख केले आहेत. त्यामुळे त्यांनी केलेले देशी आणि वैश्विकतेचे विवेचन अत्यंत मूलगामी ठरते.
मराठी कादंबरीचा त्यांचा समीक्षात्मक आलेख दर्जेदार मांडणीचा वस्तुपाठच देतो. आपल्या देशातील आंग्ल साहित्यावरचे त्यांचे हरकतीचे मुद्दे अतिशय अभ्यसनीय आहेत. भाषाशैलीचाही विचार त्यांनी एकंदर जगण्याची शैली व तिचा एक अविभाज्य घटक म्हणून एका सांस्कृतिक परिप्रेक्ष्यात केलेला आहे. “म्हणून हिंदुस्थान हे केवळ एककेंद्री राष्ट्र नसून एक हळूहळू बदलत जाणारे बहुकेंद्री बहुअक्षी भूमिसातत्य आहे.” हे नेमाडे यांचे विधान आपल्या समकालीन साहित्य समस्यांना मौलिक ऐतिहासिक परिप्रेक्ष्यात समजून घेण्याची दृष्टी देते.