Description
डॉ. सुनंदा रेवसे-हिरेकरने कवितेतील अर्थाच्या गाभ्यापर्यंत प्रवेश करून त्यातून आशयार्थाची मौत्तीके मोठ्या खुबीने बाहेर काढली आहेत. कवितेतील अनेकविध जाणिवांचे पदर चिंतनशील वृत्तीने उलगडत नेण्याचे सामर्थ्य आणि कौशल्य या समिक्षेत प्रकर्षाने जाणवते. समाज जीवनाच्या विभन्न क्षेत्रातील परिवर्तनवादी विचारांचे ठळक संदर्भ देणाऱ्या कवितांवर लेखिका तेवढेच स्पष्टपणे भाष्य करते. संवेदनक्षम कवी मनात व्यवस्थेला सामोरे जाताना दाटून आलेले काळोखी हुंदके ऐकते.
प्रस्तुत ग्रंथात समाविष्ट कलाकृतीतील अनुभवांशी साधर्म्य-वैधर्म्य शोधण्याच्या प्रयत्नातून, साहित्यकृतींच्या जाणिवा उणिवा पडताळून पाहण्याच्या स्वाभाविक भूमिकेतून निर्माण झालेली ही समीक्षा रसास्वादात्मक, चिंतनगर्भ व सर्वांगपूर्ण आहे. तटस्थ भूमिकेतूनच वाचक-समीक्षक वाङ्मयकृतींचे खऱ्या अर्थाने . मूल्यमापन करू शकतो. नव्या-जुन्या कवितांकडे पाहण्याची लेखिकेची समीक्षादृष्टी सखोल आणि व्यापक तितकीच तटस्थ असल्याचा प्रत्यय येतो. एकीकडे संवेदनक्षम मनाचं आस्वादनात गुंतत जाणं आणि पुन्हा निष्ठेने अलिप्त होवून या साहित्यातून जगण्याचं मर्म टिपणं या दोनही गोष्टी या लेखनात सहजसाध्य झाल्या आहेत. ही समीक्षादृष्टी वाचकालाही समृद्ध करते.- प्रा. मीनल येवले