Description
बाईचं घर मेणाचं’ या कादंबरीच्या केंद्रस्थानी आहे साळू नावाची मुलगी. तिच्या आई, आजी, चुलत्या, शेजारणी, तिच्या मैत्रिणी, त्यांचे नातेवाईक, गावातल्या स्त्रिया, काही तरुण आणि म्हातारे पुरुष असं मिळून एक पूर्ण गाव या कादंबरीत उभं राहिलं आहे. गावात, त्यांच्या राहरीतीत होणारे बदल, माणसांच्या प्रामुख्याने स्त्रियांच्या नात्यांमधील आणि एकूणच जगण्याच्या बदलांमधील निरिक्षणे, तिच्या मनात उगवणाऱ्या त्या त्या वेळीच्या बालसुलभ, तारुण्यसुलभ कुतुहलासकट, प्रश्नांसकट अत्यंत संवेदनशिलतेने लेखिकेने टिपली आहेत. साळूच्या लहानपणीपासून ते तिच्या सुमारे अठरा वर्षांची होईपर्यंतचा हा सारा प्रवास आहे. नात्यांचा एक कोलाज त्यातून उभा राहिलेला आहे. आता सगळीकडे जवळपास नामशेष झालेल्या जुन्या सण, संस्कार, रितीरिवाज यांचा दस्तऐवज यात आहे. अखेर निळावंतीच्या कहाणीचे बहारदार निवेदन आहे. अगदी भाबड्या वयापासून ते समज येण्याच्या वयाच्या उंबरठ्यावर उभे राहतानाच हा साळूचा आणि तिच्या मैत्रिणींचा प्रवास वेधक असाच आहे.