Description
संध्याकाळी तांबूस लाल धुळीबरोबर गायी घराला याव्यात आणि गुरा- वासरांच्या हंबरानं गाव व्याकूळ होऊन जावं. मंदिराच्या आरतीचा घंटानाद दूर माळरानावरही ऐकू यावा आणि हळू हळू चांदणं गावावर पसरून जावं. पहाटेला मोटेवरच्या गाण्यांनी,जात्यावरच्या ओव्यांनी गाव जागं व्हावं,असं कवीला आजही वाटतं.परंतु आधुनिक युगात ते शक्य नाही ही खंत कवी मधुकर कवडे यांना अस्वस्थ करीत राहते. म्हणूनच…..
सायंकाळी घंटानाद
गाव ऐकू येत नाही
संकरित गायी कुठे
चरावया जात नाही…
अशा नव्या युगाची ओवी ते सहज लिहू शकतात. जुने गाव, सणवार, रिती-रिवाज आणि शेत शिवारात राबणाऱ्या बाया – माणसांचं दैनंदिन जगणं कवीने अगदी सहजसोप्या शब्दातून व्यक्त केलं आहे. कवी मधुकर कवडे यांच्या बाणगंगेच्या तीरावर आपण शांत बसून राहिलं तरी स्वच्छ, निर्मळ पाण्यात डुंबल्याचा आनंद तर मिळेलच शिवाय बाणेश्वराच्या मंदिरातील शांतता आपल्याही अंत:करणापर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही.