Description
विनोद बुद्धी ही एक देणगी आहे. ती सहजप्रवृत्तीही आहे. ही प्रवृत्ती जगण्यातील विसंगती शोधते आणि ती नेमकेपणाने मांडते. विनोद हा सामाजिक व्यंगावरचा उपचार ठरला आहे.
मराठी साहित्यात कोल्हटकर, चिं. वि. जोशी, आचार्य अत्रे, पु.ल.देशपांडे, द. मा. मिरासदार, शंकर पाटील यांनी विनोदी साहित्याची परंपरा समृद्ध केली.
संजय कळमकर यांनी त्यांच्या विनोदी लेखनाने मराठी साहित्यात मोलाची भर घातली आहे. सत्तेच्या विकेंद्रीकरणाच्या प्रयत्नात ग्रामीण भागात शैक्षणिक, राजकीय, सामाजिक आणि सहकार क्षेत्रातील वेगवेगळी सत्ताकेंद्रे निर्माण झाली आणि त्यातूनच या क्षेत्रातील नेते आणि पुढारी देखील उदयास आले. काही अपवाद सोडल्यास सुसंस्कृतपणाची वानवाच सगळीकडे पहायला मिळते आहे. या तथाकथित पुढारीपणावर विनोदाच्या माध्यमातून कळमकर अतिशय भेदक शैलीने कधी प्रहार करतात तर कधी ओरखडे, चिमटे काढतात. ऐकणाऱ्याला-वाचणाऱ्याला एकाच वेळेला मनमुराद हसवतात आणि त्याचवेळी अंतर्मुखही करतात. हीच श्री. कळमकर यांच्या लेखनाची खासियत आहे. बे एकं बे या संजय कळमकरांच्या कथासंग्रहातून त्यांच्या खास शैलीचा प्रत्यय वाचणाऱ्याला सातत्याने येत राहतो.
- नामदेवराव देसाई