Description
प्रवीण दशरथ बांदेकर यांची ‘चाळेगत’ ही कादंबरी तिच्यातील गांभीर्य, पारदर्शकता, तिची खोली, व्याप्ती व तिच्यातील प्रयोगशीलता या सर्व विशेषांचा विचार करता विशेष उल्लेखनीय ठरते. गेल्या पंचवीसेक वर्षांतील कोकणाचे वर्तमान, या वर्तमानाला आकार देणारे सामाजिक, राजकीय, आर्थिक ऊर्जास्रोत, त्यातून होणाऱ्या बदलांमुळे माणसांची होणारी ससेहोलपट, निर्माण झालेले विक्राळ प्रश्न या कादंबरीमधून बांदेकरांनी वाचकांसमोर ठेवले आहेत. मराठी कथनात्म साहित्यात समुद्र फारसा येत नाही. ‘चाळेगत’ मध्ये मात्र तो केंद्रस्थानी आहे आणि अत्यंत अभिनव पद्धतीने तो साकार झाला आहे. समुद्र आणि मानवी जीवन या दोन गोष्टी एकमेकांत घुसल्या आहेत याची जाणीव सतत तिच्यात हो राहते. समुद्राच्या भव्यतेचे आणि प्रतीकक्षमतेचे अशा प्रकारचे उदाहरण मराठी साहित्यात विरळाच आहे असे म्हणावे लागेल.
मूल्यांचे अध: पतन झालेल्या वर्तमान राजकारणात वेगळ्या भूमिका समंजसपणे समजून घेण्याचे औदार्य राहिलेले नाही. अशा परिस्थितीत या राजकारणाला टीकेचे लक्ष्य करण्यासाठी फार मोठे धैर्य लागते. धोका स्वीकारत जगण्याचे हे धैर्य ‘चाळेगत’च्या पानापानामधून जाणवत राहते. मराठी कथनात्म साहित्यात राजकारणातील अपप्रवृत्तीचा परामर्श एवढ्या थेटपणे प्रथमच घेतला जातो आहे, या गोष्टीचाही उल्लेख करणे अगत्याचे वाटते.
कादंबरीचे हे ओबडधोबड पण लवचीक प्रारूप कादंबरीतल्या लेखकाला दशावताराच्या खेळातील संकासुराच्या पात्रामधून मिळाले आहे. विदुषकी चाळे करीत व व्यवस्थेचे बुरखे फाडीत हा संकासुर दशावताराच्या खेळामध्ये वावरत असतो. संकासुराची ही सर्व कसरत ‘चाळेगत’च्या पानापानात केवळ रचनाकौशल्याची चूष म्हणून आलेली नाही. तिचा संबंध जगण्याच्या, वास्तवाच्या स्वरूपाशी आहे. ते सतत बदलते, आकलनाच्या कक्षेत येणे नाकारणारे, निश्चित उत्तरांना बगल देणारे आहे. अशा वास्तवाला सामोरे जाण्यासाठी तेवढाच लवचीक आकृतिबंध शोधण्याचा हा प्रयत्न वाखाणण्याजोगा आहे.