Description
छत्तीसगड हे शंकर गुहा नियोगी यांचं कार्यक्षेत्र. आसाममध्ये एका बंगाली कनिष्ठ मध्यमवर्गीय भद्र कुटुंबात जन्मलेला हा तरुण रोजगाराच्या निमित्तानं या मुलखात येतो आणि तिथल्या लोकांची सुखदु:खं, त्यांची संस्कृती, त्यांची अस्मिता यांच्याशी स्वत:ला इतका जोडून घेतो की, तो त्या लोकांचाच होऊन जातो हे अद्भूत आहे. अशी विरळ वा अपवादात्मक उदाहरणंच आपल्यातल्या भारतीयतेची, आपल्याला एकत्र जोडणाऱ्या अदृष्य सशक्त धाग्यांची द्योतक आहेत.
भक्कम दार्शनिक पाया, सामान्य माणसांच्या दुःखाशी अविच्छिन्न बांधिलकी, सत्यनिष्ठा आणि अजोड निष्कलंक चारित्र्य यांच्या बळावर तीव्र इच्छाशक्तीचं आंतरिक सामर्थ्य वापरून एखादा माणूस असंघटित, दुर्लक्षित पीडीत माणसांचं संघटन उभं करून किती अद्भूत कार्य करू शकतो याचं नियोगींचं कार्य हे अपवादात्मक महत्त्वाचं उदाहरण आहे. सामान्य माणसाच्या पर्यायी जीवनलढ्याचे रस्ते शोधू पाहणाऱ्या देशभरातल्या कार्यकर्त्यांना ते दीपस्तंभाइतकं महत्त्वाचं वाटत राहील.
प्रस्तुत ग्रंथात नियोगी यांच्या जीवन कार्याचा आढावा तर आहेच पण मुख्यत: त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचं काम आज छत्तीसगडात किती उरलंय याचा अभ्यास; त्याची मांडणी आहे. ती कार्यकर्त्यांना व अभ्यासकांना निश्चितच उपयोगी होईल.