Description

मूलतः कृषिजीवनाशी आणि लोकसंस्कृतीशी ‘नाळ’ जोडून असलेल्या श्री. लामखडे यांनी लोकरीती, लोकाचार, लोकभावना आणि लोकसंकेतांना हाताशी धरून रानपाखरांशी मनस्वी संवाद केला आहे. लोकगीतांचा आधार घेत आपल्या नात्यागोत्यांचा आणि रानशिवाराचा उत्कट, काव्यात्मक आणि प्रवाही भाषेतून स्व-रूपधर्म साकारलेला आहे. साळुंकी, सुगरण, टिटवी, होला, भारद्वाज, मोर, कोकिळा, पावशा, चिमण्या, कावले अशा पाखरांवर खरं तर काय लिहावं? असा प्रश्न पडण्याऐवजी पाखरांवर आणि त्यांच्याविषयी काय काय आणि किती किती लिहू ही भावना त्यांच्या ‘चिमण्यां चिवचिवल्या’ मधील एकूणच लेखांतून दिसून येते. खेड्यात – विशेषतः शेतकरी जीवनात पशुपक्ष्यांना विशिष्ट असे स्थान असते. कितीतरी प्रकारची नातीगोती या पाखरांनी निर्माण केलेली दिसतात. या पक्षीसृष्टीचं योगदान मानवसृष्टीशी एकजीव झालेलं आहे. माणसानं या साऱ्या पक्षीजीवांना न्याहाळीत, निरखीत काही वर्तन संकेतांना निश्चित केलेलं दिसतं. लोकसंकेत, चालीरीती, रुढीपरंपरांनाही यात सामावून घेतलेलं आहे. आमचं सारं लोकसाहित्य, संतसाहित्य, महानुभावसाहित्य आणि आधुनिक साहित्यही अशा पक्षीसंकेतांना अधोरेखित करीत समृद्ध झालेलं आहे. श्री. लामखडे यांनी ग्रामलक्षी जाणीव भाषेतून आणि नेमक्या ललिताक्षरांपासून पक्षिसंस्कृती म्हणजेच लोकसंस्कृती अधिक अर्थपूर्णपणे नोंदविलेली आहे.

Additional information

Book Author