Description
गोकुळामध्ये बालकृष्णाने केलेल्या अनंत लीलांमधील एक लीला मोठी मधुर आहे. रांगणाऱ्या कृष्णाने आपल्या रूपसुंदर मुखात मातीची बाळमूठ रिती केलेली पाहताच माता यशोदा धावून आली. ‘आई मी नाही खाल्ली ग माती’ असे म्हणत खऱ्याखोट्याचा निवाडा करण्यासाठी नंदनंदनाने उघडलेल्या त्याच्या सुकुमार बाळमुखात चौदा भुवनांचे दर्शन घडल्याने यशोदा विस्मयचकित होऊन गेली. ‘चिंतनासी न लगे वेळ, हे डॉ. दिलीप धोंडगे यांनी संतबोधाच्या मांडलेल्या कीर्तीगायनातून साकारलेले ग्रंथरूप म्हणजे त्या बालकृष्णाचे विस्तारलेले मंगल मुखकमलच जणू! त्यांत डोकवले की आपल्याला घडते भागवतधर्मीय संतपरंपरेच्या विराट विचारविश्वाचे बीजरूपदर्शन… आणि आपली अवस्थाही होऊन जाते गोकुळातल्या यशोदेसारखी. ‘महाराष्ट्र’ नावाचे मन संतबोधाने घडवलेले आहे. “संतांचे संगती मनोमार्ग गती”, या ज्ञानदेवांच्या उक्तीनुसार प्रेम, समता, नीतीपूर्ण भक्ती यांसारख्या शाश्वत मूल्यांच्या मार्गावरून वाटचाल करत गुणसंपन्न अशा ऐहिक – पारलौकिक जीवनाच्या ध्येयाप्रत जाण्यासाठी लोकसंस्थेला गतिमान राखणाऱ्या संतबोधाचे स्मरण सर्व काळ घडावे यासाठी या ग्रंथाचे पाथेय सतत हाताशीच हवे.