Description
क्रुसाला टांगल्या जाणाऱ्या येशूसारखा बोरीबाभळींना टांगला जाणारा डोळ्यात अंधार घेऊन पांगत जाणारा कुणबी हाच या कवितेचा गाभाघटक आहे हे सगळं भयाण वास्तव कवितेच्या पातळीवर नेऊन स्वतःच्या अस्सल भाषेत मांडल्यामुळे ही कविता आतला गहिवर घेऊन आलेली आहे. काळजाला पीळ पाडणारी दुःखाची परिभाषा आणि मातीच्या उगवण शक्तीवरची दुर्दम्य आशा या कवितेत पाहायला मिळते. म्हणूनच ही कुणब्याच्या वर्तमानाची श्रेष्ठ कविता आहे. मातीला जपण्यासाठी आयुष्य पेरणारा हा कवी डोईजड झालेलं दुःख कविता करून हलकं करतो. शतकानुशतकं पडिक पडलेल्या इतिहासाची नांगराच्या बोरूनं नांगरट करणारा हा कवी येणाऱ्या भयानक काळावर मात करण्यासाठी नवा नायक घडवू पाहात आहे. वर्तमानालाच न कळणारी वर्तमानाची लिपी उलगडून दाखवायचं अवघड काम कवीनं या कवितेत केलेलं आहे. त्यामुळेच शिलालेखात वानगीदाखलही पाहायला न मिळणारी कुणब्याची आदिम वेदना इथे शिल्पीत झालेली पाहायला मिळते. – इंद्रजित भालेराव