Description
पोपट सातपुते गेली सुमारे पंचवीस वर्षे कविता लिहीत आहेत. त्यांची कविता हा समकालीन मराठी कवितेतला विशिष्ट एकांकी आशयघन स्वर म्हणता येईल. कारण या प्रकारची कविता आणखी कोणीही लिहिताना दिसत नाही. आधी कोणी लिहिल्याचेही मला माहीत नाही. जोडायचेच ठरले तर एकीकडे या कवितेचे नाते मराठी भाषा जन्मण्याआधीच्या प्राकृत गाथासप्तशतीतल्या गाथांमधल्या नाजुकतेशी आहे. आणि दुसरीकडे तिला टागोरांच्या कवितेतल्या गूढतेशी, दार्शनिकतेशी, आध्यात्मिक आशयसंपन्नतेशी जोडता येईल. ग्रामजीवन व त्यापेक्षाही त्यापल्याडच्या रानातला निसर्ग आणि एकांडा माणूस यांच्यातल्या नात्यांची अल्पाक्षरी चित्रे रेखाटताना या प्रकारचे दुपेडी प्रभाव क्षेत्र त्यांनी अंगभूतपणे निवडलेले दिसते. सभोवतीच्या दुनियेच्या संदर्भात आत्मशोध घेतानाही याच प्रभावक्षेत्राचा पट त्यांना सोयीस्कर वाटलेला आहे. दीर्घकाल सातत्याने, स्वतःच्या लयीशी संवेदक इमान राखीत इतकी आशय संपन्न कविता लिहिणारा या प्रकारचा दुसरा कवी नाहीय, इतकी त्यांची कविता वेगळी आहे. त्यांच्या अलिकडच्या काही कवितात सामाजिक आशय चांगल्या ताकदीने डोकावतो. तरीही ते त्यांच्या कवितेचे बलस्थान म्हणता यायचे नाही. अपवादात्मक तरलता, गूढता, चित्रात्मकता व आध्यात्मिकता ही त्यांच्या कवितेची काही वैशिष्ट्ये .म्हणता येतील. ती महत्त्वाची अशीच आहेत. वरवर सोप्या दार्शनिक भाष्यांसारखी वाटणारी ही कविता आपण सहजी ओलांडून पुढे जाऊ शकत नाही. वाचावे तिथे घोटाळत मुख्यार्थ, ध्वन्यार्थांच्या गोफात गुरफटत काहीतरी घेऊन उठल्याखेरीज पुढचा रस्ता दिसत नाही. जगण्यातल्या ओलसर जिव्हाळ्याची मंद्र धून शांतपणे वाजवत राहणारी ही कविता म्हणूनच फार फार महत्वाची आहे.