Description
‘आयडियल स्टेट’ ही मूळ प्लेटोची संकल्पना आहे. कवींनी विवेक, शौर्य, संयम आणि न्याय या सद्गुणांचा परिपोष करणारे लेखन केले पाहिजे असा त्याचा आग्रह होता. जे असे लेखन करणार नाहीत त्यांना आदर्श राज्यात स्थान असणार नाही. याउलट स्थिती इथे आहे. हे सद्गुण ज्यांच्याकडे होते त्यांना ‘मनू’ प्रणीत व्यवस्थेने बहिष्कृत केले, शूद्र ठरवले. या वर्गाचा प्रतिनिधी असल्याची जाणीव ‘आयडियल स्टेटच्या हद्दीबाहेरून’ हा कविता संग्रह देतो.
‘मनू’ प्रणीत आदर्श राज्यात नैतिकतेला वाव नाही म्हणूनच धर्म व्यवस्थेने लादलेल्या संकल्पना आणि विचारव्यूहांवर प्रहार, त्यातील मिथकांना उद्ध्वस्त करण्याचे काम कवीला करावे लागते. कविता संग्रहातील बहुतांश कविता याचा प्रत्यय देतात. ‘सौभाग्यवती कुमारी शारदा ब्रह्मे’, ‘आंबेडकर चौक’, ‘बळी’, ‘कबीर’ ह्या कविता त्याचे प्रातिनिधिक उदाहरण म्हणता येतील. दलित कवितेने सुरू केलेल्या परंपरेला कवेत घेऊन किंबहुना तिला अधिक समृध्द करीत नव्या वाटा शोधण्याचा ध्यास इथे प्रत्ययाला येतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या आदर्श राज्याच्या संकल्पनेकडे वाटचाल करायला प्रवृत्त करणारी ही कविता रसिक व विचारी मनाला जागे करते. प्लेटोच्या भाषेत बोलायचे झाले तर रसिकांना ती नैतिक बनायला प्रवृत्त करते.
सिध्दार्थ तांबे यांची कविता ही विकसनशील आहे. ‘यातनांच्या कहाण्या होतांना’ चे पुढचे पाऊल या कविता संग्रहातून अनुभवाला येते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरप्रणीत आदर्श राज्य वा समाजव्यवस्थेच्या विरोधात जे जे काही दिसते ते बदलून सम्यक समाजव्यवस्थेला बळकट करण्यासाठी त्यांनी साधलेला संवाद हा निश्चितच प्रत्येक रसिक वाचकाला प्रेरणादायी ठरेल यात शंका नाही.