Description
लघुकथेच्या चिंचोळ्या अवकाशाला बाजूस सारून भारतीय कथेच्या परंपरेला आपलेसे करणाऱ्या कथाकारात पंकज कुरुलकर यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. त्यांचा ‘इनसायडर’ हा नवा कथासंग्रह याची ठळक साक्ष देतो.
या संग्रहातील सर्वच कथा महानगरीय जीवन वास्तवाचा शोध घेणाऱ्या कथा आहेत. भद्र लोकांच्या जगण्यातील गुंतागुंत, ताणतणाव या बरोबरच या जगण्यातील अखंड अतृप्ततेचे अंतःस्तर या कथा आपल्या चिमटीत पकडण्याचा प्रयत्न करतात.
लघुकथेच्या एकसूरी आशयसूत्रास नकार देऊन मुख्य आशयसूत्रास अधिक ठळक करणाऱ्या उपआशयसूत्रांच्या पाठबळावर या कथा आकारास येतात. महानगरीय परिक्षेत्रातील भद्र लोकांच्या जगण्यातील अतृप्तता त्यांच्या कथेच्या केंद्रभागी आहे. या संग्रहातील ‘इनसायडर’, ‘भूमिका’, ‘शिवाजी पार्क’, ‘भित्रा’ या कथा मानसशास्रदृष्ट्या महत्त्वाच्या आहेत. उथळ जगण्याचा तळ शोधण्याचा लेखकाचा प्रयत्न उल्लेखनिय आहे. ओघवते निवेदन, अनलंकृत भाषा, तपशिलाची योग्य निवड यामुळे या कथा अधिक गुणवत्तापूर्ण ठरतात.
– राजन गवस