Description
नगर – महानगर, निमशहर-खेडे या सगळ्यांना पोटात घेऊन माणसाचा निखळ शोध हे रंगनाथ पठारे यांच्या कथेचे मूलभूत- वैशिष्ट्य ! त्यामुळे जगण्याच्या मूलभूत प्रेरणांचा अखंड शोध त्यांच्या कथांतून प्रत्ययाला येतो. जात-धर्म-पंथ यातून माणसाच्या जगण्यात निर्माण होणाऱ्या तणावांचे चित्रण करता करता वृत्ती प्रवृत्तींच्या मुळाशी पोहोचण्याचा प्रयत्न करत, जगण्याचा तळ गाठण्याची आकांक्षा त्यांची कथा बाळगते. आशयसूत्रांची व्यामिश्रता आणि गंभीर जीवनदृष्टीचा प्रत्यय त्यांच्या प्रत्येक कथेतून येतो. आशयाला समृध्द करणारे तपशिल आणि आशयानुरूप स्वतंत्र शैली यामुळे त्यांची प्रत्येक कथा स्वतंत्र गुणवत्ता धारण करते. रूढ साचेबंद कथेचा तोंडवळा बाजूस सारून एकसुरी आशयसूत्रातून मराठी कथेला मुक्त करण्याचे श्रेय पठारे यांच्या कथेला द्यावे लागते. या संग्रहातील मजहबची वस्ती, घडण यासारख्या कथा मराठीतील श्रेष्ठ कथांत समाविष्ट कराव्या लागतील. रूढ कथन परंपरेच्या कक्षा विस्तारित करून स्वतंत्र प्रयोगशीलताप्राप्त पठारे यांच्या कथा मराठी कथेला अधिक सक्षम करणाऱ्या आहेत हे आवर्जून नोंदविले पाहिजे.