Description
या कथासंग्रहातील प्रसाद कुमठेकर यांची ‘लघु’कथा ही पात्र, प्रसंग, घटना यांच्या शोभिवंत आत्मछटाईतून आकाराला आलेली नाही. मानवी जीवनाची अपूर्णता आणि अर्थपूर्णता यांच्याशी कथेचा असलेला संबंध शोधता शोधता नैसर्गिकपणे ती या रूपात प्रकट झाली आहे. ब्रह्मांडातून पिंडात प्रविष्ट झाल्यासारखी. त्यामुळे ही कथा स्वल्प अवकाशात विश्वाची निर्मिती, मानवी उत्क्रांती यांच्यापासून जन्म, मृत्यू, मैथुन, कुटुंबकलह अशा अनेक बाबी सक्षमपणे हाताळते. समकाळाला ‘बोलतं’ करण्याची विलक्षण हातोटी या कथेला लाभलेली आहे. याचं बहुतांश श्रेय या कथेच्या उदगिरीभाषक निवेदकाला जातं. हा निवेदक अनेकदा काळापुढे, परिस्थितीपुढे हात टेकल्याचं भासवतो. त्याद्वारे कसलेला फलंदाज हेतुपूर्वक स्वयंचीत व्हावा तसा जाणूनबुजून आत्मवंचित होतो आणि तेजतर्रार विनोदाची निर्मिती करतो. निवेदन शैलीच्या या ‘कुमठेकरी’ गुणविशेषामुळे कथेचा रसरशीतपणा कठीण काळातल्या हतबल करणाऱ्या परिस्थितीतही कायम राहतो.
सद्यःकालाच्या तातडीने, संवेगाने या कथेचा प्रवास ‘लघु’कडून ‘लघुत्तम’कडे सुरू झाला आहे. या कथाकाराच्या लेखणीने दूरचित्रवाणी, समाजमाध्यम, वर्तमानपत्र अशा विविध माध्यमांतून आपलं वळण गिरवलेलं आहे. त्याद्वारे सांप्रत काळाचं ‘शब्दसंख्याशास्त्र’ स्वतःत मुरवून घेतलं आहे. एकविसाव्या शतकाचा पाव भाग संपत असताना मराठी कथेच्या भावी वाटचालीची एक दिशा यातून सूचित होते. या संग्रहातील “क्ष’ची गोष्ट’, ‘हॉमरशिया…’, ‘इन्सलटेड सेल्स’ इत्यादी सर्वच कथा त्या दिशेने सुसाट सुटलेल्या आहेत. कुमठेकर यांच्या पुढच्या संग्रहातील ‘इतर’ गोष्टींची वाचकांनी ताटकळत वाट पाहावी, इतकी या संग्रहातील ‘इत्तर गोष्टीं’ची मातब्बरी आहे.
किरण गुरव