Description
आपल्याकडे स्त्रियांना एकतर देवीचा दर्जा दिला जातो किंवा दास्यत्वाचा. पुरुषसत्ताक समाजात स्त्रियांचे शोषण हा सवयीचा भाग झाल्याने त्याविषयी एखाद्या पुरुषाने काहीतरी करणे इथपर्यंत ठीक आहे, पण स्त्रियांच्या सर्व नात्यांविषयीच्या भावना कवितेतून व्यक्त करणे आणि त्याचा एक संपूर्ण कवितासंग्रह होणं हे निश्चितच कैलासच्या संवेदनशील, मनाचं आणि जागरूक व खरा पुरुष असल्याचं लक्षण आहे. स्त्रियांच्या समस्या समजावून घेऊन, त्यांच्या मानसिकतेतून कवितेच्या माध्यमातून मांडणे हे अद्भुत आहे. कैलास ज्या छोट्याशा गावातून आला आहे, त्याची जडणघडण, त्याचा आत्तापर्यंतचा वैयक्तिक आयुष्याचा प्रवास आणि सरकारी नोकरीत असूनही त्याच्या भावना निबर न होता त्या अजून संवेदनशील झाल्या, यातूनच कैलास मधला खरा आदर्श पुरुष दिसून येतो. प्रत्येक पुरुषाने वाचावी, समजावून घ्यावी अशी ही कविता ! खरा पुरुष बनण्याची संधीच या कवितांद्वारे कैलासने निर्माण केली आहे. स्त्री- पुरुष समानतेच्या कार्यात कैलासचा हा कवितासंग्रह एक प्रबोधनाचा महत्त्वाचा संग्रह आहे यात कसलीही शंका नाही. स्त्रियांना ओळखता येत नाही, किंवा स्त्रियांच्या मनात काय चालले आहे हे देवालाही कळत नाही असं आपल्याकडे बोललं जातं, पण कैलासचा हा कवितासंग्रह वाचल्यास स्त्रियांच्या मनातलं पुरुषांना कळायला मदत होईल हे नक्की. – गिरीष लाड