Description
ग्रामीण कथेच्या प्रवाहाला समृद्ध करणाऱ्या मान्यवर लेखकांतील एक नाव म्हणजे द. ता. भोसले : गंभीर आणि विनोदी कथा प्रवाहांमध्ये मोलाची भर घालणारी त्यांची कथा या संग्रहाच्या रुपाने ग्रामीण संस्कृतीचे एक वेगळे आणि मौलिक दर्शन घडविते. भूक, दारिद्र्य, शोषण आणि विषमता यांच्या दाहक विळख्यात सापडलेल्या सामान्य माणसाच्या विस्कटलेल्या आयुष्याचे येथे जसे भेदक दर्शन घडते; तसेच या जनसामान्याच्या श्रद्धा, धारणा आणि परिस्थितीमुळे आकारास येणाऱ्या विशिष्ट जीवनशैलीचे देखील दर्शन त्यांच्या या कथांतून घडते. ग्रामीण मातीशी असलेले सारे संबंध तोडून सुखवस्तू उबदार जीवन जगणाऱ्या मानसिकतेचेही दर्शन या कथांतून घडते. कसदार आणि समृद्ध अनुभवविश्व, प्रवाही भाषा; ग्रामीण जीवनाविषयी वाटणाऱ्या उत्कट आस्थेतून निर्माण झालेले तेज आणि प्रत्ययकारी जिवंत व्यक्तिचित्रण याचा ही कथा एकाच वेळी आनंदही देते आणि अस्वस्थही करते. हेच या संग्रहाचे सामर्थ्य आहे.