Description
विजयनगरच्या स्थापनेपूर्वीपासून संतमंडळी विठ्ठलाला ‘कानडा’ म्हणतात. ‘कानडा हो विठ्ठलु कर्नाटकु’ अशा शब्दांत ज्ञानदेव विठ्ठलाचा उल्लेख करतात. ‘कानडा विठ्ठल उभा भीवरेतीरी । भक्तांचे आर्त वो जीवा लागले भारी II, असे नामदेवांनी म्हटले आहे. नाथांनी तर ‘तीर्थ कानडे देव कानडे । क्षेत्र कानडे पंढरीये । विठ्ठल कानडे भक्त हे कानडे । पुंडलिक उघडे उभे केले।।’ अशा शब्दांत विठ्ठलाचे कानडेपण समग्रपणे वर्णिले आहे. ‘कानडा’ म्हणजे ‘अगम्य’ आणि ‘कर्नाटकु’ म्हणजे ‘करनाटकु’ (लीलालाघवी) असे अर्थ घेऊन विठ्ठलाच्या कर्नाटकीयत्वाचे, त्याच्या कानडेपणाचे निराकरण करण्याचा प्रयत्न अनेक मराठी अभ्यासक पुन्हा पुन्हा करताना दिसतात. परंतु प्रादेशिक अस्मितेच्या भूमिकेतून हे प्रयत्न कितीही सुखद व अभिमानास्पद वाटले, तरी वस्तुस्थिती तशी नाही’, असे सांगून डॉ. रा. चिं. ढेरे आपल्या ‘श्री विठ्ठल : एक महासमन्वय’ या ग्रंथात म्हणतात, ‘पंढरपूरचे पुरातन नाव ‘पंडरंगे’ हे पूर्णपणे कन्नड आहे. विठ्ठलाचे बहुतेक हक्कदार सेवेकरी कर्नाटकीच आहेत. त्यांचे मूळचे कुळदेव कर्नाटकातलेच आहेत. याशिवाय आणखी किती तरी लहानसहान बाबी अशा आहेत की, त्या विठ्ठलाचे कानडेपण निःसंदिग्धपणे घोषित करणाऱ्या आहेत. कानडा खंडेराय आणि कानडा रामराजा ही अनुक्रमे खंडोबा व विजयनगरचा रामराजा -यांच्या उल्लेखातली विशेषणे विठ्ठलाच्या ‘कानडा’ या विशेषणाशी समरूप आहेत.’