Description

मराठी कथा कहाणी, गोष्ट, लघुकथा, नवकथा, गूढकथा, दलित कथा, ग्रामीण कथा, स्त्रीवादी कथा, आदिवासी कथा, महानगरीय कथा अशी विकसित झालेली आहे. कथा हा प्रकार स्थुलातून-सूक्ष्माकडे- अतिसूक्ष्माकडे चालू आहे. माणूस बदलला, माणसाची संस्कृती बदलली तेव्हा कथेनेसुद्धा आपले रूप बदलले. एकेकाळी नीतीपाठाची शिकवण देणारी कथा आज जीवनदर्शनात गढलेली दिसते. मानवाबरोबरच जन्माला आलेली. कथा ही नाना रूपे घेऊन व नाना स्वरूपाचे उन्मेष धारण करून आज आविष्कृत होत आहे. अनेकविध जाणिवांचा तळ गाठून त्यातून अतिसूक्ष्म व पारदर्शक असे जीवनदर्शन घडवित आहे. एकीकडे कथेचा विकास होत आहे. तर दुसरीकडे विविध अंगांनी तिचा विस्तारही चालू आहे.