Description
रवी कांबळे ह्यांचा कवितासंग्रह म्हणजे चांगल्या कवितांसाठीचा शोध आहे. एका आश्वासक कवितेची बीजं यात दडली आहेत. मुख्य म्हणजे त्यांच्या कवितेचा आशय, आकृतीबंध यापेक्षाही त्यांची संवेदनशीलता अधिक महत्त्वाची आहे. आजूबाजूच्या असंवेदनशील समाजात अशा प्रकारे अभिव्यक्त होणे ही विशेष औचित्यपूर्ण बाब आहे. भवतालाकडे अतिशय डोळसपणे पाहणे आणि त्यासंदर्भात आपल्या अशा वेगळ्या शैलीत अभिव्यक्त होणे हे विशेष आहे. कवीचं काळीज हे समाजाचे दुःख समजून घेण्यासाठी असते. आपल्या भावना आणि भवतालच्या लोकांच्या अडचणी, त्यांच्या व्यथा कवी आपल्या शब्दांमधून वर्णन करत असतो.. आणि त्यासाठी त्या शब्दांना योग्य तो न्याय देणं हे कवीचं प्रथम कर्तव्य आहे. रवीची ही धडपड त्यांच्या काव्यातुन जाणवते. या कवितांमध्ये कधी दाहक वास्तव कधी प्रेम, कधी समर्पण, कधी अस्वस्थता, ते खूप खोलवर झिरपते आणि आपल्यालाही अस्वस्थ करते. या कवीची पहुच सर्वत्र आहे. खूप दिवसांनी खरंखुरं काहीतरी वाचलं. ते दाहक आहे, त्यात ताकदही आहे. ह्या कविता वास्तवता दर्शवून डोळे उघडणान्या आहेत. समाजाप्रती आपली काही एक बांधिलकी आहे, आपल्या एकूणच नातेसंबंधांविषयी आणि समाजाविषयी संवेदनशील असणे हे ह्या कवितांचे प्रधान मूल्य आहे असे मला वाटते. लेखन आणि कृती यात फरक न करता आपल्या विचारांसाठी ते झटत आहेत असे जाणवते…त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक तुकडा म्हणजे हा काव्यसंग्रह. या पहिल्याच कवितासंग्रहाच्या रुपाने वाचकांना वेगळ्या प्रकारची कविता.. अनुभवायला मिळणार आहे. – अंजली दासखेडकर