Description
“काव्याचा भावार्थ” हे डॉ. नीलिमा गुंडी यांचे समीक्षेचे पुस्तक समीक्षेतील सर्जनशीलतेचा प्रत्यय देणारे आहे. आपल्या काव्यपरंपरेत ‘भावार्थ’ ही संकल्पना शतकानुशतके काव्याला जोडली गेली आहे. भावार्थ जाणल्यावरच काव्याच्या सखोल आशयविश्वात प्रवेश मिळू शकतो. या पुस्तकात आधुनिक भावकाव्य, नवकाव्य, दलित काव्य, स्त्रीवादी काव्य, विडंबनकाव्य अशा काव्यप्रवाहांची अभ्यासपूर्ण समीक्षा आहे. शिवाय विसाव्या शतकातील काव्यसमीक्षेचीही समीक्षा आहे. हे पुस्तक वाचकांच्या मनातील समीक्षेविषयीची भीती दूर सारतेच, शिवाय ज्ञानक्षेत्रातील स्तिमित करणारा अनुभव त्यांच्यापर्यंत सहजपणे पोहोचवते.
शतकभरातील काव्य आणि काव्यसमीक्षा यांच्या वळणवाटांच्या गतीची स्पंदने यात टिपली आहेत. तसेच समीक्षेच्या नव्या दिशाही यात सुचवल्या आहेत. लेखिकेच्या व्यासंगामुळे दृष्टीला आलेला पैलूदारपणा आणि रसज्ञतेमुळे प्राप्त झालेली मर्मदृष्टी यांचा अनुभव या पुस्तकातून वाचकांना येईल. विविध समीक्षापद्धतींचे गरजेनुसार उपयोजन करून केलेले हे लेखन अभ्यासकांना जसे उपयुक्त आहे, तसेच सर्वसामान्य वाचकांनाही रसिक या पदापर्यंतचा प्रवास करण्यासाठी मार्गदर्शक ठरणारे आहे.