Description
भगवानराव देशमुख यांनी कविता लिहून आपल्यासमोर ठेवली आहे • असं कधीच वाटत नाही. सहज, अलगद ते आपल्याशी बोलत आहेत इतकी उत्स्फुर्त शब्दयोजना त्यांच्या कवितेत असते. हे त्यांचं बोलणं फक्त सहजच नसतं तर सहजगाचंही असतं. प्रणयातली असो की प्रलयातली असो, खुपणारी सलणारी वेदना मोठ्या संयमानं ते सांगून जातात. जणू स्वतःशीच बोलत आहेत अशा एका आत्मस्वरानं आशयातला अर्थ वाहू लागतो. शेतात खपणारा शेतकरी असो की, शेत सोडून मोलमजुरीच्या शोधात निघालेला गावकरी असो, त्याच्या व्यथा ही न संपणारी कहाणी आहे. जगण्याची पांगापांग, सुखाची पांगापांग असं पार ढासळून गेलेलं प्राणवास्तव भगवानराव देशमुख कवितेतून मांडतात. रानाच्या मनाची आणि वनाच्या जनाची दुर्दशा रेखाटणारी ही कविता स्वत: मात्र अबोल आहे. दुर्दैव घेऊन जगणारा जीव डोंगराची आंघोळ पाहून पावसाची झिंग संभूपार्वतीच्या संग अनुभवतो तेव्हा वाटतं, या सुखाला असंच सातत्य सापडलं तर किती पालट पडेल. कवी पहाटेच्या त्या स्वप्नाचा शुभंकर असतो. – फ. मुं. शिंदे