Description
विसावं शतक मागे टाकून एकविसाव्या शतकात प्रवेशताना जी स्वप्नं आपण पहात आलो, त्या स्वप्नांची पडझड होताना पाहण्याचा हा काळ आहे. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात विपरीताचा झालेला उठाव, भ्रष्टतेचा सर्वसत्ताक फैलाव आणि जगण्याला रसद पुरवणाऱ्या विकासोन्मुख गोष्टींचा पाडाव हे एकविसाव्या शतकाच्या प्रारंभकाळाचं व्यवच्छेदक लक्षण बनलं आहे. संस्कृतीची अनेक प्रकारची पडझड होत असताना सर्वसामान्य माणसांची होणारी ससेहोलपट हा या कादंबरीचा आशय आहे. समाजातल्या अनेक छोट्या-मोठ्या व्यवस्था पोखरल्या जात असताना, धर्म, जात, पक्ष यांचे झेंडे नाचवत कोलाहाल करणाऱ्या आंधळ्या समूहांचे आवाज टिपेला पोचलेले असताना संवेदनशील माणसांनी परस्परांना घातलेली हाक या कथानकातून ऐकू येते आहे. ही कादंबरी म्हणजे मूल्य ऱ्हासाचं दुःख सोसणाऱ्या माणसाची उमेद टिकवून ठेवण्याची धडपड आहे. आतला दिवा विझू न देण्याचा प्रयत्न आहे. जीवनहितैषी गोष्टींना धरून ठेवण्याचा निकराचा अट्टाहास आहे. समकालिन कादंबरीत स्वतःचं स्वतंत्र स्थान निर्माण करू पाहणारे हे “संभ्रमांचे वर्तमान” एक संवेदनशील आणि समंजस लेखन आहे.