Description
मीनल येवले ही कवयित्री खरोखरच मृण्मयी आहे. माती, पाणी, पाऊसवारा पाऊसवारा यांचा आंतरिक झरा तिच्या कवितेतून खळाळत राहतो. अतिशय काळीजस्पर्शी अशा या प्रतिमांचे आभरण हाच त्यांच्या कवितांचा निसर्गनिर्भर साज आणि बाज आहे. भूमी आणि स्त्री यांच्यात एक प्राक्प्राचीन अनुबंध आहे. मातीच्या कुशीत धान्य अन् बाईच्या कुशीत जीव ही ऋतुचक्राची जातकुळी एकच आहे आणि त्याची लय मीनलची कविता सांभाळून आहे हा तिचा आत्मानुभव रसरशीत तितकाच घसघशीत असल्याचे जाणवत राहते, ‘बाई आणि माती’ यांच्यातील अविट, उदात्त आणि दिव्यात्म नाते अनादि काळापासून असल्याचे धर्मिय विधीविधानानी अधोरेखित केले आहे. मूलतः मीनल येवलेचा पिंड निसर्ग सौंदर्यावर पोसलेला असल्याने तिच्या कवितेत तो कस जाणवतो. ही निसर्गवेडी कवयित्री भूमी आणि पाणी यांचे स्तोत्र गाणारी भावसंपन्न तीर्थयात्री देखील आहे. अस्तित्वाचे चंद्रलेणे भाळी गोंदवून आलेली ही कवयित्री मराठी कवितेत आपले रक्तचंदनी नाते रेखाटताना जाणवते. उद्याच्या मराठी कवितेत तिच्या नवसृजनाचा हा जोगवा भरभरून गोडवा निर्माण करणार यात शंका नाही. -डॉ. मधुकर वाकोडे