Description
निसर्ग कवी बाबासाहेब सौदागर हा आमच्या चित्रपट सृष्टीला लाभलेला अतिशय तरल मनाचा प्रतिभावंत कवी आहे. निळावंती प्रमाणे त्याला पक्षांची बोली भाषा कळते असं मला सतत वाटतं. अतिशय रसरशीत अलवार सौंदर्य प्रतिमांची वेगवेगळ्या शब्दकळेची चित्रमय बाबासाहेब सौदागर कविता तो घेऊन येतो. सृजनशील माणसाच्या मनात आनंद लहरी चैतन्य निर्माण करणारी जीतसदृष्यता वाचकांना भारावून टाकते. मंत्रमुग्ध करणारी चाल या कवितेला उपजत असते, यामुळे अनेक संगीतकारांना ही कविता रानभूल घालते. कृत्रिम दुःख आक्रोशाच्या कवितांमुळे वाचक भांबावलेल्या स्थितीत असतांना आता निसर्ग कविता संपणार आहे. ती स्वतः आत्महत्या करणार आहे अशी स्थिती निर्माण झालेल्या वेळी बाबासाहेब सौदागर निसर्ग कवितेला सन्मानाने माहेरी घेऊन येतो. तिला आत्मविश्वास आणि अभयदान देतो. तिला शृंगाराच्या रत्नजडीत अलंकारांनी गरतीपणाचं सौभाग्य बहाल करतो. चित्रपट सृष्टीत आणि वाङ्मयीन क्षेत्रात वैभव देतो. स्वतः तो मृगपक्षी होऊन निसर्ग कवितेची परंपरा भाग्यशाली करतो. अशा अनेक चित्रमय लयबद्ध कविता हा “मृगपक्षी” घेऊन आला आहे. या कवितांना लोकप्रियता आणि अजरामर होण्याचे भाग्य लाभणार आहे. कितीही वादळं आली तरी ही निसर्ग कविता अमरत्व घेऊन आलेली आहे. रसिक वाचक यांच्या मनात ती आनंद लहरी निर्माण करत राहणार आहे.
पितांबर काळे
ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक, मुंबई.