Description
एका पाहणीत असं आढळून आलं आहे, की १० पैकी ४ डॉक्टरांची नखे वाढलेली असतात. डॉक्टरांचे हे असे तर सामान्य माणसांचे काय? ‘नखे कापणे’ म्हणून मला एक संस्कार वाटतो. तो प्राथमिक शाळेतच गुरुजींनी दिला पाहिजे असं वाटतं. म्हणजे मग ते अंगवळणी पडेल. अगदी छडी लाग छम छम सारखा संस्कार दिला तरीही चालेल, ‘नखे कापेल तो अपघातातून वाचेल’ असेही शिकवा हवं तर. रविवारी (दवाखान्याला सुट्टी न घेता डॉक्टरांनी नखे कापावीतच.) पु. ल. देशपांडे नेहमी म्हणत की पुस्तकांची चोरी झाली पाहिजे. पुस्तकं चोरीला गेली पाहिजेत. तसं मला वाटतं नेलकटर चोरीला गेलं पाहिजे. नेलकटर चोरी गेले, तर चोर नखं कापेल. चोराने ते भंगार वाल्याला विकलं तर तो भंगारवालाही नखंच कापेल. शिक्षक घरी घेवून गेले शाळेतून तर ते घरी नखंच कापतील. कामगाराने घरी नेलं तर कामगाराच्या घरचे लोक नखंच कापतील. ब्लेड, वस्तरा ह्यांचे दुसरे उपयोग समाजाला माहीत आहेत. नेलकटरचा नखं कापण्याशिवाय दुसरा उपयोग काहीच नाही. म्हणून ही नखं कापण्यासाठी नेलकटर.
ही नखांची पोथी समजा. निष्ठेने वाचा.आचरणात आणा. त्यासाठी आम्ही सर्व डॉक्टर प्रार्थना करतो माती चरणी, शेती चरणी पाणी देवतेकडे, वायुदेवतेकडे पंचमहाभूतांकडे प्रार्थना.