Description

गजानन रायकर यांच्या ‘नातालीन’ या कथा संग्रहातील कथा बव्हंशी गोव्यातल्या कुळवाडी स्त्री-पुरुषांच्या कथा आहेत. त्यातही अधिक करून त्या स्त्रियांच्या कथा आहेत. तिथल्या गरीब कुळवाड्यांच्या जगण्याचं अतिशय अस्सल व भावगहिरं चित्रण रायकरांच्या कथेत येतं. उत्कट मांडणी, सहजसुंदर भाषा, भावुकता व असाधारण करुणाभाव इ. गुणविशेषांमुळे त्यांची कथा वैशिष्ट्यपूर्ण आणि वाचनीय झाली आहे. गोव्याच्या कोकणी भाषेच्या पर्यावरणात जगणाऱ्या रायकरांसारख्या लेखकानं मराठीत लिहिणं हे खरं तर मायमराठीवर उपकारच आहेत. तिथला अप्रतिम सुंदर निसर्ग, कोकणी भाषेची कोवळीक हे सगळं त्यांनी आपल्यासाठी या कथांतून पेश केलंय. रायकरांची कथा आपणाला गोव्याच्या मातीशी, तिथल्या माणसांशी, निसर्गाशी जोडते. वरवरच्या निसर्गसुंदर गोव्यापेक्षा अधिक आत या कथा आपल्याला नेतात, तिथल्या कष्टकऱ्यांच्या सुखदुःखाशी आपल्याला जोडतात. मी या कथा वाचल्या आणि त्यांच्या प्रेमात पडलो. तुम्ही वाचल्यात तर तुमचंही तसंच होईल याची मला खात्री आहे.

Additional information

Book Author