Description
आंबेडकरवादी कविता अनेक मूलगामी हस्तक्षेपांच्या पेटत्या जंगलासारखी आहे. ठिणग्यांच्या शब्दबंधांमधून आणि ज्वालांच्या वाक्यबंधांमधून ती पुनर्रचनेचा सूर्यपिसारा फुलवते. पूर्ण प्रयोगशील माणसासाठी आणि एकूणच माणसांमधील बंधुतामय आणि भगिनीतामय संबंधांच्या चांदण्यासाठी या कवितेनं निर्वाण मांडलं आहे. मराठी कवितेत १९६० नंतर आंबेडकरवादी कवितेनं सुरु केला तो मूल्यसंग्राम केवळ अपूर्व होता. १९९० नंतरच्या आंबेडकरवादी कवितेने याच मूल्यसंग्रामाला आणखी नव्या संदर्भबंधात उभे केले आणि सतत पुनर्रचनाशीलता या आपल्या चारित्र्याची ज्वलंत साक्ष पटविली.
जीवनाचे बदलते संदर्भ कवितेला वेगळेपण देतात पण असे वेगळेपण कवितेला नेहमी मौलिकच करते असं म्हणता येत नाही. आंबेडकरवादी कविता मात्र १९९० नंतरही आपलं बदलत्या संदर्भातील वेगळेपणही आणि आपली मौलिकताही शाबीत करण्यात यशस्वी झाली असेच म्हणायला हवे. ‘नव्वदोत्तर आंबेडकरी कवितेची मीमांसा’ या ग्रंथात डॉ. अशोक इंगळे यांनी घेतलेला मौलिकतेचाही वेध वेधकच आहे. डॉ. इंगळे यांचे हार्दिक अभिनंदन.